श्रीराममंदिराकडून राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या दिशेने

न्यूज भारती - मराठी    18-Mar-2024
Total Views |
 
प्रतिनिधी सभा
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरमध्ये १५ ते १७ मार्च दरम्यान पार पडली.
श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामलल्लाच्या मूर्तीची झालेली प्राणप्रतिष्ठा आणि त्यासंबंधीच्या भावना व्यक्त करणारा प्रस्ताव या सभेमध्ये संमत करण्यात आला. तो प्रस्ताव असा आहे -

 
पौष शुक्ल द्वादशी, युगाब्द ५१२५ अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामलल्लाच्या मूर्तीची झालेली भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा, हा जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि सोनेरी क्षण आहे. हिंदू समाजाने शेकडो वर्षांपासून सतत केलेला संघर्ष व बलिदान, पूजनीय संत आणि महापुरुषांच्या मार्गदर्शनानुसार चाललेले राष्ट्रव्यापी आंदोलन, तसेच समाजाच्या विविध घटकांनी केलेल्या सामूहिक संकल्पामुळे संघर्षकाळाच्या एका दीर्घ अध्यायाची सुखद सांगता झाली. अनेक संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक, विचारक, कायदेतज्ज्ञ, संचार माध्यमे व बलिदानी कारसेवकांसह आंदोलनकर्ता संपूर्ण हिंदू समाज व शासन-प्रशासन यांच्या उल्लेखनीय योगदानामुळेच हा पावन दिवस जीवनात साक्षात अनुभवण्याचा शुभअवसर प्राप्त झाला. ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ या संघर्षामध्ये आपले जीवन अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धासुमने अर्पण करते आणि उपरोक्त सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते.

 
श्रीराममंदिरातून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षतांच्या वितरण अभियानात समाजातील सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग मिळाला. लक्षावधी रामभक्तांनी सर्व शहरे तसेच अधिकांश गावांमधील कोट्यवधी परिवारांशी संपर्क साधला. प्राणप्रतिष्ठेच्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गल्लोगल्ली आणि गावोगावी स्वयंप्रेरणेने निघालेल्या शोभायात्रा, घरोघरी साजरे झालेले दीपोत्सव, फडकत्या भगव्या पताका, मंदिरे तसेच विविध धार्मिक स्थळांमध्ये आयोजित करण्यात आलेले भजन आणि कीर्तन इत्यादी उपक्रम या साऱ्यांमुळे समाजामध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला.
 
 
‘श्री अयोध्याधाम’मध्ये प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशाच्या धार्मिक, राजनैतिक आणि समाजातील प्रत्येक क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या शीर्षस्थ व्यक्ती, तसेच सर्वच मत-पंथ-संप्रदायांच्या पूजनीय संतांची गौरवपूर्ण उपस्थिती होती. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्शाला अनुरूप समरस, सुगठित राष्ट्रजीवन उभे करण्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण झालेले असल्याचेच हे द्योतक आहे. हा भारताच्या पुनरुत्थानाच्या गौरवशाली अध्यायाच्या प्रारंभाचा संकेतसुद्धा आहे. श्रीरामजन्मभूमीवर झालेल्या श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेमुळे परकीय शासन आणि एकूण संघर्षकाळात उणावलेल्या आत्मविश्वासातून आणि आत्मविस्मृतीतून समाज बाहेर येत आहे. संपूर्ण समाज हिंदुत्वाच्या ओतप्रोत भावनेने आपल्या 'स्व'ला जाणण्यासाठी तसेच त्याच्या आधारावर जीवन जगण्यासाठी सिद्ध होत आहे.

 
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचे जीवन आम्हाला सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध राहून, समाज व राष्ट्राकरता त्याग करण्याची प्रेरणा देते. त्यांची शासन पद्धती रामराज्याच्या नावाने जगाच्या इतिहासात प्रतिष्ठित आहे, ज्या रामराज्याचे आदर्श सार्वभौमिक आणि सार्वकालिक आहेत. आज जीवनमूल्यांचा होणारा ऱ्हास, क्षीण झालेल्या माननी संवेदना, विस्तारवादामुळे वाढती हिंसा, क्रूरता इत्यादी आव्हानांचा सामना करण्यासाठी रामराज्याची संकल्पना संपूर्ण विश्वाकरता आजही अनुकरणीय आहे.

 
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे विचारपूर्वक असे मत आहे की, संपूर्ण समाजाने आपल्या जीवनात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्शांना प्रतिष्ठित करण्याचा संकल्प करावा, ज्यामुळे राममंदिराच्या पुनर्निर्माणाचा उद्देश सार्थ होईल. श्रीरामांच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित त्याग, प्रेम, न्याय, शौर्य, सद्भाव तसेच निष्पक्षता इत्यादी धर्माच्या शाश्वत मूल्यांना समाजामध्ये आज पुन्हा प्रतिष्ठित करण्याची आवश्यकता आहे. परस्परांतील सर्व प्रकारचे वैमनस्य आणि भेद समाप्त करून समरसतायुक्त पुरुषार्थी समाज निर्माण करणे, हीच श्रीरामांची खरीखुरी आराधना असेल.

 
अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सर्व भारतीयांना आवाहन करते की, बंधुत्वभावयुक्त, कर्तव्यनिष्ठ, मूल्याधारित आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणारा समर्थ भारत निर्माण करावा. या आधारावर भारत एक सर्वकल्याणकारी वैश्विक व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण करू शकेल.