खादीपासून तयार झालेल्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होईल, असे अनुमान कोणी दहा वर्षांपूर्वी केले असते, तर ते अनुमान नक्कीच हास्यास्पद ठरले असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा एकतरी कपडा खरेदी करण्याचे आवाहन देशवासियांना केले आणि त्यांच्या या आवाहनामुळे, संदेशामुळे खादीच्या उत्पादनात आणि विक्रीमध्ये खरोखरच विक्रमी वाढ झाली.
खादी महामंडळाचीच आकडेवारी यासाठी पुरेशी बोलकी ठरावी. खादी उत्पादनांमध्ये सन २०१४ ते २०२१ या आठ वर्षात १७२ टक्के एवढी भरभक्कम वाढ झाली. खादीच्या उत्पादनाचा आणि विक्रीचा हा आलेख सतत उंचावतच राहिला आहे. खादी उत्पादनांच्या विक्रीत झालेली वाढ थक्क करणारी आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार करता खादी उत्पादनांच्या विक्रीमध्ये ३३२ टक्के एवढी वाढ झाली आहे.
खादी हे आपल्या स्वतंत्रता आंदोलनाचे प्रतिक आहे. खादी आणि ग्रामोद्योग हा भारताचा वारसा आणि बहुमूल्य ठेवा आहे. ते रोजगारनिर्मितीचेही एक महत्त्वाचे साधन आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत ग्रामोद्योग सुरू करता येतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण कारागिरांना कायमस्वरूपी रोजगारही मिळतो तो खादीच्या तसेच पारंपरिक उत्पादनांमधून. त्याबरोबरच त्यांचा वापर करताना स्वदेशी उत्पादन म्हणून अभिमानाने वापर केला जातो, हेही वैशिष्ट्य आहे. या उत्पादनांना खूप मोठा ग्राहकवर्गही आहे.
मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी लाकडी खेळणी खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. हे आवाहनही जनमानसात प्रभावीरीतीने पोहोचले आणि भारतीय खेळण्यांचा खप चांगलाच वाढला. शिवाय, कलाकारांचे मनोबलही वाढले. खेळण्यांच्या निर्यातीची विचार केला तर गेल्या दहा वर्षात भारतातून होणारी खेळण्यांची निर्यात चौपटीने वाढली आहे.
पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना साहाय्य करण्यासाठी तसेच पारंपरिक उद्योग-व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. ग्रामोद्योगांची नेमकी गरज काय आहे आणि ती कशापद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते, हे या योजनांमधून कारागिरांना अनुभवायला मिळत आहे.
प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)