प्रत्येक घटनेचे श्रेय स्वतःकडे घेण्याच्या ओंगळ स्पर्धेच्या जगात, संघाची ही भूमिका नक्कीच वेगळेपण दर्शविणारी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
(Rashtriya Swayamsevak Sangh) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे वृत्त आश्वासक आहे. या सभेत झालेली चर्चा आणि निर्णय संघाच्या सर्वस्पर्शी विचारांचे द्योतक आहे. समाजमान्यता आणि विश्वासार्हता लाभलेली ही संघटना, देशात सर्वदूर पसरलेली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाने केलेला व्यापक जनसंपर्क संघटनेच्या ताकदीचे आणि विस्ताराचे प्रतिक आहे. राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक ठरलेल्या राम मंदिराचे स्वप्न साकार झाल्याचे संपूर्ण श्रेय संघाने समाजाला देऊन आपली विनयशिलता आणि परिपक्वता यांचे दर्शन घडविले आहे. प्रत्येक घटनेचे श्रेय स्वतःकडे घेण्याच्या ओंगळ स्पर्धेच्या जगात, संघाची ही भूमिका नक्कीच वेगळेपण दर्शविणारी आहे. त्यासाठी वैचारिक आणि व्यावहारिक परिपक्वता आवश्यक असते. संघाने त्याचा दाखला पुन्हा एकदा दिला आहे.
रा. स्व. संघ आता शताब्दीच्या उंबरठ्यावर उभा आहे. यानिमित्ताने संघाने आपला शाखाविस्तार आणखी सर्वदूर आणि सशक्त करण्याचे योजिले आहे. दैनंदिन शाखा आणि साप्ताहिक मिलन हा संघाच्या कार्यशैलीचा अविभाज्य भाग आहे. संघकार्याचा विस्तार झाला तर त्याचा सकारात्मक परिणाम साहजिकच समाजजीवनवर होतो. संघाला अपेक्षित सज्जनशक्ती याच माध्यमातून तयार होते. संघ शाखांचा विस्तार ही एक निरंतर प्रक्रिया आहे. साहजिकच शताब्दीनिमित्त संघाने अधिक जोरकसपणे या प्रक्रियेला गती देण्याचे ठरविलेले दिसते. राष्ट्रीय विचारांबरोबरच सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन आणि पर्यावरण आदि विषय संघाने गेल्या काही वर्षात प्राधान्याने हाती घेतले आहेत. हे विषय समाजाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. काळाबरोबर स्वतःमध्ये योग्य बदल करणे, हे संघाचे वैशिष्ट्य आहे. याच कारणामुळे संघ सातत्याने गुणात्मक आणि संख्यात्मकरित्या वाढत आहे. संघाची स्थापना होण्यापूर्वी आणि संघ स्थापनेनंतर अनेक संस्था जन्माला आल्या. मात्र काळाच्या ओघात त्या अस्तित्वहीन झाल्या. संघाने कालसुसंगत भूमिका घेतल्याने समाजात अपेक्षित बदल घडवून आणणे संघाला शक्य झाले.

संघाचा निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लक्षणीय आहे. संघ निवडणुकांकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर ‘राष्ट्रीय दृष्टीने’ बघतो. त्यासाठीच संघाने आगामी निवडणुकांमध्ये शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी संघ स्वयंसेवक समाजामध्ये जनजागरण करतील. मात्र मतदान करताना नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देऊन विभाजनवादी घटकांना बाजूला सारावे, अशीही संघाची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा बाळगणे अत्यंत रास्त आहे, कारण सरकारमुळे वर्तमानावर निखालस परिणाम होत असतो, हे वास्तव आहे. उदाहरणार्थ, राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा असे अनेक विषय प्रदीर्घ काळ प्रलंबित होते आणि सध्याच्या सरकारने ते यशस्वीपणे सोडविले आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. संघाने कधीही वैचारिक अस्पृश्यता मानली नाही. राम मंदिर सोहळ्यात अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संघ स्वयंसेवकांसमवेत सहभागी झाले होते. संघाने त्यांचे मनापासून स्वागत केले होते. `राजकीय’ नव्हे तर `राष्ट्रीय’ विचार हा संघाचा कायम आग्रह राहिला आहे.
सामाजिक समरसतेविषयी संघ खूप आग्रही आहे. सामाजिक समरसता आणि हिंदू संघटन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा संघाचा विश्वास आहे. पुनर्नियुक्त सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की, समरसता हा विषय संघाच्या रणनीतीचा किंवा धोरणाचा भाग नसून तो निष्ठेचा विषय आहे. समरसतेच्या क्षेत्रात संघ प्रदीर्घ काळ कार्यरत आहे. तथापि अजूनही सामाजिक विषमतेचे निर्मूलन झालेले नाही, याचीही संघाला जाणीव आहे. त्यासाठीच समान पाणवठा, समान स्मशानभूमी आणि समान मंदिर विषयांबाबत संघ आग्रही असून त्यादृष्टीने कार्यकर्ते काम करीत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी निमित्त संघाने व्यापक जागरण मोहीम करण्याचे ठरविले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य केवळ अतुलनीय आहे. त्यांच्या स्मरणामुळे सामाजिक समरसतेच्या विषयाला अजून गती मिळेल, असा विश्वास आहे. तीन शतकांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य घराघरात पोहोचले तर हिंदुत्वाचे व्यापक दर्शन होईल आणि समरसतेच्या भावनेला बळकटी प्राप्त होईल.
संदेशखाली येथे झालेल्या अत्याचारांची संघाने अपेक्षेप्रमाणे गंभीर दखल घेतली आहे. एक अर्थाने हा विषयसुद्धा समरसतेशी संबधित आहे. संघ या विषयात सक्रिय असून पीडितांना सर्व मदत देण्यास कटिबद्ध आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संबधित नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून हा विषय योग्य पातळीवर हाताळला जाईल, असा विश्वास आहे. मणिपूरमधे संघ त्याच्या शैलीप्रमाणे शांतपणे काम करत आहे. कुकी आणि मैतेयी या दोन्हींच्या जबाबदार नेत्यांशी संयुक्त चर्चा घडविण्यास संघाने पुढाकार घेतला असून काही प्रमाणात शांतता प्रस्थापित होत आहे, ही आशादायक बाब आहे.
संघाने अल्पसंख्य या शब्दाला घेतलेला आक्षेप अनपेक्षित नाही. समतेच्या दृष्टीने अल्पसंख्य ही कल्पना टिकूच शकत नाही. देशात अल्पसंख्याकवादावर आधारित प्रदीर्घ काळ राजकारण चालू आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपण भोगत आहोत. दुर्दैवाने राजकीय पक्ष अल्पसंख्यवादाला उत्तेजन देतात आणि परिणामी देशाला गंभीर संकटांना तोंड द्यावे लागते. अल्पसंख्य समाजसुद्धा याला बळी पडतो. संघ या विषयात अल्पसंख्य समाजाच्या नेत्यांशी प्रदीर्घ काळ चर्चा करीत आहे. हा विषय दीर्घ काळ चालणारा असून त्यासाठी अपेक्षित संयम आणि व्यापक देशहिताची भावना आवश्यक असून ती संघाजवळ निश्चितच आहे.
सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)