नारी शक्ती; नव्या भारतासाठी पथप्रदर्शक

News Bharati Marathi    17-Mar-2024
Total Views |

-ऋता मनोहर बावडेकर



संकोच वाटावा अशा अनेक परिस्थितीला महिलांना सामोरे जावे लागत होते. गेली पन्नास वर्षे अकरा कोटी घरांमध्ये शौचालय नव्हते. महिलांना उघड्यावर शौचास जावे लागायचे आणि त्यांच्यासाठी ते संकटच असे. पण १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी ‘स्वच्छता मिशन’बद्दल बोलले आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे, आज देशात ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधून झाली आहेत.
 
nari shakti 

स्वच्छतागृह नसल्याने मुलींनी शाळा सोडू नये यासाठी आतापर्यंत कोट्यवधी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. ‘उज्ज्वला योजने’अंतर्गत सुमारे दहा कोटी कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचे मोफत कनेक्शन देण्यात आले. पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरावे लागू नये म्हणून ‘हर घर नलसे जल’सारख्या भगीरथ योजनेतून केवळ चार वर्षांत पाण्याचे मोफत कनेक्शन तीन कोटींवरून तेरा कोटींच्या घरांत पोचले. महिलांना अंधारात राहावे लागू नये म्हणून सौभाग्य योजनेद्वारे मोफत वीज कनेक्शन देण्यात आली आहेत. पैसे नाहीत म्हणून महिलांनी आपले आजारपण लपवू नये म्हणून ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपये देण्यात येतात. घरातील संपत्तीवरही महिलांचा अधिकार असावा यासाठी ‘पीएम आवास योजने’तील घरांमध्ये त्यांना भागिदारी देण्यात आली आहे. महिलांनी स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी गॅरंटीशिवाय कर्ज देणारी ‘मुद्रा योजना’ सुरू करण्यात आली. आतापर्यंत या योजनेत सत्तर टक्के महिलांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत.

याचप्रमाणे ‘स्टँड-अप इंडिया योजने’अंतर्गत ऐंशी टक्के लाभार्थी महिलांना ‘ग्रीन फिल्ड योजनां’साठी कर्ज मिळत आहे. बाळंतपणाच्या रजेतही वाढ करून ती २६ आठवडे करण्यात आली आहे. याआधी १२ आठवड्यांची रजा मिळत असे. सैनिकी शाळांमध्ये आता मुली प्रवेश घेऊ शकतात. हवाईदल, नौदल, पायदळ या लष्कराच्या तीनही दलांची दारे मुलींच्या प्रवेशासाठी खुली करण्यात आली आहेत. नऊ कोटींहून अधिक महिलांना ‘स्व-सहायता समूहाशी’संबंधित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘लखपती दीदी’ करणाऱ्या आणि ‘स्व-सहायता समूह’च्या महिलांना ड्रोन देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतीसाठी या ड्रोनचा वापर करता येऊ शकतो.

लहान मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत तीन कोटी १८ लाख खाती सुरू करण्यात आली आहेत. महिला आज विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती करत आहेत. उंच उंच भरारी घेत आहेत. जगभरातील महिला वैमानिकांची संख्या पाच टक्के आहे. मात्र भारतातील महिला वैमानिकांचे प्रमाण १५ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या दहा वर्षांत वाढले आहे.

सामाजिक स्तरावर विचार करायचा, तर ‘तीन तलाक’मुळे महिलांवर अन्याय होत होते. या प्रथेविरुद्ध कायदा करून ते रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील कोट्यवधी महिलांची या कुप्रथेपासून सुटका झाली आहे. हा कायदा झाल्यापासून या प्रकरणांचे प्रमाण ८०-८२ टक्के कमी झाल्याचे सांगितले जाते. समाजव्यवस्थेत ज्या कमतरता आहेत, त्यात सुधारणा आणण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून ‘महिला आरक्षण विधेयक’ही मंजूर करण्यात आले आहे.

महिला सुरक्षित आणि समृद्ध असतील, तर जगही तसे होते. त्या आर्थिकदृष्ट्या सबल झाल्या की विकासाला गती येते. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या विचारांमुळे सकारात्मक बदल होऊ शकतो, या भावनेतून आणि या विश्वासाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेले हे सारे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत.


(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)