-सत्यजित जोशी
मनोहर पर्रीकरांवरील स्मरण लेख म्हणजे आत्मवेदनेला निमंत्रण ! पर्रीकरांच्या अकाली एक्झिटनंतर त्यांच्या अनेक चाहत्यांचे विधात्यासमवेत भांडण झाले असेल. इतक्या साध्या, सरळ, प्रामाणिक आणि निष्ठावान व्यक्तीला इतका अल्पवेळ ? पर्रीकरांवरील स्मरण लेख लिहिताना निर्जिव लेखणीतूनसुध्दा शाईऐवजी अश्रू पाझरतील. १७ मार्च हा त्यांचा स्मृतिदिन.

पर्रीकर हे मुलखावेगळे व्यक्तिमत्व होते. या स्मरण लेखात त्यांचा जन्म, कुटुंब, शिक्षण, रा. स्व. संघाचे त्यांच्या जीवनातील स्थान, राजकारणातील प्रवेश, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेले काम, केंद्रीय मंत्री म्हणून केलेले काम आणि त्यांनी मृत्युशी दिलेली झुंज या प्रस्थापित चौकटीत स्मरण अपेक्षित नाही. पर्रीकर स्वत: अशा चौकटीत बसणारे नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'आऊट ऑफ बॉक्स' या कल्पनेचा वारंवार उल्लेख करतात. कदाचित म्हणूनच मोदींनी 'आऊट ऑफ बॉक्स' असलेल्या पर्रीकरांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घडवून आणला असावा. पर्रीकर या विश्वासाला अल्पकाळात सार्थ ठरले. देशभरातील जनतेने त्यांच्या कामाची पद्धत बघून 'असाही राजकारणी असू शकतो' या भावनेने निश्चितच कौतुक केले असेल. पर्रीकरांची आठवण होताच फक्त एका आणि एकाच शब्दाचे स्मरण होते. हा शब्द म्हणजे साधनशुचिता.
पर्रीकर म्हणजे नकारात्मकतेने भारलेल्या राजकारणातील प्रकाश दिवा होते. देशकार्यासाठी आयुष्य अर्पण केलेले काहीजण गोव्यामध्ये कार्यरत होते. पर्रीकरांचे ते अत्यंत जवळचे मित्र होते. ही मैत्री पर्रीकर राजकारणात येण्यापूर्वीपासूनची होती. त्यातील अनेकजण माझेही घनिष्ठ मित्र आहेत. त्यांच्याकडून पर्रीकरांच्या साधेपणाच्या अनेक कथा ऐकायला मिळायच्या. या कथा कपोलकल्पित, अतिरंजित वाटत असत. या कथा 'सुरस' ते ' काहिही' या वर्गवारीत मोडत असत. परंतु पर्रीकर राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर या कथांची सत्यता अनुभवता आली. संरक्षण मंत्री झाल्यानंतरसुध्दा हा गृहस्थ अत्यंत साधाच राहिला. साधी पॅंट आणि तितकाच साधा शर्ट घालून हा माणूस आंतरराष्ट्रीय पातळीवर लिलया वापरायचा. लष्कराचे कडक प्रोटोकॉल जणू काही त्यांच्या गावीच नव्हते. (जॉर्ज फर्नांडिस हेही असेच एक संरक्षण मंत्री होते).
साधेपणा, प्रामाणिकता, वैचारिक निष्ठा आदी गुण राजकारणातून लुप्त होत असताना पर्रीकरांनी त्याला झळाळी आणण्याचा प्रयत्न केला. गोव्याचे मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर सुध्दा या माणसाच्या जीवनशैलीत यत्किंचितही बदल झाला नाही. कुठल्याही क्षणी ते पिशवी घेऊन मंडईत भाजी आणायला स्कूटर वरून निघतील, असे वाटत असे. परंतु, इतका साधा माणूस देशासाठी किती कठोर होऊ शकतो याचे प्रत्यंतर संरक्षण मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक वेळा आले.
प्रखर राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि तत्वनिष्ठा यामुळे पर्रीकरांनी राजकारणात वेगळाच आदर्श निर्माण केला. तोसुद्धा अत्यंत अल्पकाळात. प़ंडित दीनदयाळ उपाध्याय राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचे पुरस्कर्ते होते. पर्रीकर म्हणजे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या ठायी स्वार्थ आणि अहंकाराला मुळीच थारा नव्हता. कुठल्याही पदावर असले तरी ते कायम कार्यकर्त्याच्याच भूमिकेत असायचे. नेतेपदाची हवा त्यांच्या डोक्यात कधीच शिरली नाही. 'राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे' या उक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे पर्रीकर. संघाप्रती असलेल्या अविचल निष्ठेमुळे ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले आणि 'कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती' या स़ंघ शिकवणुकीला सार्थ ठरविले.