मतदानाचा हक्क अबाधित राहण्यासाठी...

17 Mar 2024 12:32:35
मतदान केंद्र म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एखादी शाळा किंवा शासकीय इमारत येते. हातामध्ये बंदूक घेऊन उभारलेले सुरक्षा रक्षक. मतदान करण्यासाठी हातात ओळखपत्र घेऊन उभारलेल्या मतदारांच्या रांगा. मतदान केंद्रामध्ये याद्या चाळत बसलेले अधिकारी. आपल्या उमेदवाराप्रती निष्ठा दाखवत मतदानावर लक्ष ठेवून असणारे पोलिंग एजंट असे साधारण प्रत्येक मतदान केंद्राचे स्वरूप असते. वर्षानुवर्ष निवडणुकीतील असे चित्र आपण पाहत आलो आहोत.
 
voting
 
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील चिकेवाडी हे गाव मात्र या सगळ्याला अपवाद आहे. भारतासारख्या महाकाय देशाची लोकशाही कशी टिकून आहे, याचे उत्तर चिकेवाडीत मिळते. या गावातील घरांची संख्या आहे सात आणि मतदार आहेत २१. यंदाच्या निवडणुकीत हा आकडा आणखी कमी असेल. मुलगा जरा वयात आला की रोजगारासाठी तो शहराची वाट धरतो. मग गावात फक्त म्हातारी माणसे राहतात. कोकण आणि घाटमाथा यांच्या सीमेवर वसलेले हे गाव. निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली की, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदान केंद्रनिहाय अधिकाऱ्यांच्या नेमणुका होतात. ही यादी त्या त्या तालुक्यात जाते. भुदरगड तालुक्यामध्ये ज्यांच्या नावासमोर चिकेवाडी गाव लिहिलेले असते, त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ होते. कारण चिकेवाडीचा प्रवास हा त्यांच्यासाठी खडतर मार्ग असतो.

पाटगाव पर्यंत व्यवस्थित गाडी जाते. तिथून भटवाडी पर्यंत खडखडाट करत का होईना पण गाडी पोहोचते. मग भटवाडीतून ईव्हीएम मशीन, मतदारांच्या याद्या, अन्य शासकीय साहित्य डोक्यावर घ्यायचे आणि बारा किलोमीटरची चाल करायची. मग पारगडच्या पायथ्याला चिकेवाडी गाव येते. गावात मतदान केंद्रासाठी इमारत नाही. मग कोणाच्यातरी अंगणातच हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो. आदल्या दिवशी मुक्कामाला गेलेले सर्व शासकीय कर्मचारी गावातल्या कोणाच्या तरी घरातच जेवण आणि मुक्काम करतात. सकाळी त्याच्याच अंगणामध्ये ईव्हीएम मशीन टेबल खुर्ची असा सगळा प्रपंच मांडून शासकीय नियमांनुसार मतदान केंद्र उभारले जाते. दुपारी अकरा वाजेपर्यंतच गावातले अवघे २१ मतदार येऊन मतदान करतात. मतदानाची वेळ संपली की पुन्हा तो सगळा लवाजमा घेऊन हे शासकीय कर्मचारी बारा किलोमीटर चालत भटवाडीत पोहोचतात. तेथून गाडीने निर्धारित केलेल्या ठिकाणी ईव्हीएम मशीन पोहोचवतात.

चिकेवाडीत प्रचाराला देखील कुठला राजकीय पक्ष जात नाही. इथे बोगस मतदान होईल म्हणून एखादा पोलिंग एजंट ठेवावा असे कुठल्या उमेदवारलाही वाटत नाही. या गावाची वाट सुगम करावी असाही प्रयत्न फारसा झालेला नाही. कोकणकड्यावर असल्याने येथे सर्वाधिक पाऊस पडतो. सरकार तीन महिने पुरेल इतके रेशन पावसाळ्यात ग्रामस्थांना देते. कारण इथल्या ओढयला एकदा पाणी आले की तीन महिने या गावाचा संपर्क अवघड होतो. दुर्गमता, दारिद्र्य शासकीय सेवा सुविधांचा अभाव हे सगळे चिकेवाडीत पहिल्यापासूनच आहे. मग प्रश्न येतो हे २१ लोक मतदान तरी का करतात ? सर्व यंत्रणा तेथे नेण्यापेक्षा २१ लोकांनाच पाटगावमध्ये का आणले जात नाही ? याचे उत्तर गावातील ज्येष्ठ मंडळी देतात. आम्ही या देशाचे नागरिक आहोत याची जाणीव होण्याचे मतदान हे एकमेव साधन आहे. आमच्यासाठी ही शासकीय मंडळी एवढ्या लांब येतात. मग आम्ही मतदानाला नाही कसे म्हणणार ?

छोट्या गोष्टींसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना चिकेवाडीतील ग्रामस्थांचे उत्तर अंजनासारखा आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सांगतात, 'तिथल्या मतदारांना अन्य ठिकाणी नेणे शक्य आहे. पण आम्ही तसे करत नाही. चिकेवाडी मतदान केंद्रावरच मतदान करण्याचा अधिकार त्यांना लोकशाहीने दिला आहे. त्यांच्या हक्कासाठी तेथे जाऊन मतदान घेतले जाते. प्रत्येकाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.'

मतदान ही केवळ एक प्रक्रिया नाही. देशाचे नेतृत्व निवडण्याबरोबरच आपल्या नागरिकत्वाची जाणीव करून देणारी आणि देशाच्या संचालनामध्ये आपलाही वाटा आहे ही भावना मनात दृढ करणारी गोष्ट आहे.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)
Powered By Sangraha 9.0