सुखद आठवणींचा ठेवा
एका विशेष रेल्वेने आपण सर्वजण श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहोत, हे जेव्हा मला समजले तेव्हा मला अपार आनंद झाला.
पुण्यातील कसबा नगरातील कलश पूजन, कलश यात्रा आणि अक्षता वाटपामध्ये संघाचा एक स्वयंसेवक या नात्याने मी सक्रिय सहभाग घेतला. श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या स्वप्नपूर्तीमुळे २२ जानेवारीला आम्ही आमच्या कसबा नगरात साखरही वाटली.
हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि समाजाच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने झाला. नंतर भाग कार्यवाहांकडून ज्यावेळेस हे कळले की, फेब्रुवारी महिन्यात एका विशेष रेल्वेने आपण सर्वजण श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहोत, त्यावेळेस मला अपार आनंद झाला. मी लगेचच येणार हे सुद्धा कळवले. परंतु दुर्दैवाने २ जानेवारीला माझ्या आईला (वय ८८, जी स्वतः कारसेवक आहे) हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. पुढील ४०-४५ दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. आयसीयू, व्हेंटिलेटर व औषधांमुळे तिच्यामध्ये हळूहळू फरक पडत गेला. परंतु अपेक्षित सुधारणा होत नव्हती. शेवटी मी रामाला प्रार्थना केली की देवा माझ्या आईला बरे कर. म्हणजे मला तुझ्या दर्शनासाठी आयोध्येला येता येईल. ४५ दिवस आई हॉस्पिटलमध्ये होती. शेवटी शेवटी मी कळवून टाकले होते की मला अयोध्येला यायला जमणार नाही. तरीसुद्धा आईच्या सांगण्यावरून मी १४ फेब्रुवारीला अयोध्येला जाऊ शकलो. माझी प्रार्थना रामाने एैकली आणि आईसुद्धा बरी झाली.
अयोध्येत पोहोचल्यानंतर पुढील चार दिवस हे स्वप्नपूर्तीच्या आनंदात गेले. १५ आणि १६ फेब्रुवारी या दोन दिवशी श्रीरामांचे दर्शन, भव्य मंदिराचे दर्शन याने आयुष्य सार्थकी लागले असे वाटले. आस्था स्पेशल ट्रेनमधील प्रवास, ट्रेनमधील गाणी, पद्य, रामनामाचा जयघोष, अभंग, गप्पा हे सर्व सुखावणारे होते. शरयू नदीची आरती, मंदिराकडे जाणारा भव्य रस्ता, तेथील राममय वातावरण, आम्ही रहात होतो तेथील सर्व व्यवस्था या सर्व सर्व आयुष्यभराच्या सुखद आठवणी आहेत.
राम मंदिर अभियानात मी १९९० मध्ये कारसेवाला गेलो होतो. ज्या मोर्चावर गोळीबार झाला होता त्या मोर्चात मी होतो. १९९० ते २०२४ पर्यंत माझा या अभियानातील सहभाग मी अभिमानाने सर्वांना सांगतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात आपल्याला सहभागी होता आले नव्हते. त्यानंतर हिंदूंच्या सांस्कृतिक स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे मी त्यासाठीचा एक स्वातंत्र्यसैनिक झालो, याचा मला रास्त अभिमान आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी झालेला हा लढा माझ्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय शिवशंभो
म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो...
सब में राम है ।
राम सब के है ।।
बाळासाहेब पाटोळे
(लेखक निवृत्त अभियंता असून रा. स्व. संघाच्या कसबा भागाचे सेवा प्रमुख आहेत.)