मिती फिल्म सोसायटीतर्फे ‘बस्तर द नक्षल स्टोरी’चा पुण्यात प्रिमिअर

15 Mar 2024 15:47:33
पुणे, दि. १५ - समाजातील धगधगते वास्तव किती विदारक,भयानक असू शकते ते २० वर्षांच्या अभ्यासातून आपल्या सर्वांच्या समोर आणून वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बस्तरच्या माध्यमातून केला आहे, असे प्रतिपादन बस्तर चित्रपटाचे लेखक अमरनाथ झा यांनी केले.
 
pune premier pune bastar

‘मिती फिल्म सोसायटी’च्या वतीने बस्तर या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त परिसरावर आधारित सिनेमाचा प्रीमिअर शो काल पुण्यात सीटी प्राईड कोथरूड येथे निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिनेमात प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेत्री इंदिरा तिवारी आणि अभिनेता विजय कृष्णा उपस्थित होते. यावेळी माजी सहाय्यक पोलीस उपयुक्त भानुप्रताप बर्गे, अभिनेते अजय पुरकर,रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर,मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले उपस्थित होते.

झा यांनी याप्रसंगी समाजात नक्षल चळवळ कशी वाढते आणि त्याचे प्राबल्य वाढवत समाजावर अंकुश ठेवण्याचे काम करत आबालवृद्ध त्यात कसे होरपळून निघतात याची जाणीव समाजाला करून देताना विदारक सत्य समोर आणले आहे, असे सांगितले.
यावेळी कलाकार इंदिरा तिवारी यांनी मी अभिनय केला आहे पण आज आपल्यासोबत एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट पाहत आहे.

चित्रपटातील विषय अभिनयातून जिवंत केला आहे पण आपणही हा विषय सर्व समाजाच्या समोर पोहोचवावा असे आवाहन केले.
अजय पुरकर यांनी यावेळी आपण नक्षल या सामाजिक विषयावर चित्रपट करण्याचे धारिष्ट्य दाखविले त्याबद्दल लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्वांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0